मांगले : शेतकरी झोपेचे सोंग घेत आहेत, त्यामुळे साखर कारखानदार दरात आणि वजनात शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत. कारखानदारांच्या मनमानीमुळे मिळेल तो दर मुकाट्याने घेण्यात शेतकरी धन्यता मानत आहेत, ही खेदाची बाब आहे. जाब विचारल्याशिवाय कारखानदार योग्य दर देणारच नाहीत. त्यामुळे शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या जनप्रबोधन यात्रेच्या समारोपासाठी सातारा येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक रघुनाथदादा पाटील यांनी केले.
जनप्रबोधन यात्रेदरम्यान मांगले (ता. शिराळा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाऊन आता कारखानदारांचे ठाकरे सरकार आले आहे. सराईत कारखानदारच मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे सर्वजण ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसत आहेत. झोन बंदीविरोधात आम्ही आवाज उठवल्यामुळे झोनबंदी लागू झाली; मात्र कारखानदारांनी एकत्रित येऊन टगेगिरी केली आणि एकच दर ठरवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्याचे षड्यंत्र रचले. मते देऊन निवडून दिलेले कारभारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. शेतकऱ्यांची चाललेली लूट थांबविण्यासाठी आम्ही जनप्रबोधन यात्रा सुरू केली आहे; मात्र शेतकरी पुढे येताना दिसत नाहीत. तुम्ही हक्काचे पैसे न मागता गप्प बसला, तर पुढील काळात तुम्हाला आणखी खोल खड्डा खणण्यात कारखानदार मागेपुढे पाहणार नाहीत.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, जिल्हा संघटक धनपाल माळी, शिवाजी नांदखेड, धनंजय कदम, किशोर पाटील यावेळी उपस्थित होते.