शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या मैनुद्दीन बागवान यांनी सहा महिन्यांपासून फिल्डिंग लावली. पण महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. तरीही सत्तांतराचे श्रेय घेण्यासाठी मात्र राष्ट्रवादीतील अनेक मंडळी समोर आली आहेत. दुसरीकडे पराभवाचे खापर महापालिकेचे कारभारी भाजपचे शेखर इनामदार यांच्यावर फोडले गेले. ‘दिग्विजया’चे वाटेकरी अनेक असतात, तर अपयशाला एकटाच जबाबदार असतो, असे म्हटले जाते. नेमका असाच काहीसा प्रकार सध्या महापालिकेच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपचे सात नगरसेवक फोडले. पण त्यासाठी सहा महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. या सात नगरसेवकांपैकी दोघेजण शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या संपर्कातील आहेत, तर उर्वरित पाचजणांना बागवान यांनी राष्ट्रवादीसोबत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली. पालकमंत्री जयंत पाटील यांचा कौलही बागवान यांच्या बाजूनेच होता. पण शेवटच्याक्षणी दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीतील नायकवडी गटाने बागवान यांच्या मार्गात अडथळा आणला. त्यात स्वपक्षीयातील नेतेमंडळींनाही बागवान हे महापौरपदी नको होते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट झाला. महापालिकेतील सत्तांतरानंतर कुणीच बागवान यांना श्रेय दिले नाही. उलट किंगमेकर म्हणून अनेकजणांनी स्वत:चा उदोउदो चालविला आहे. महापौर निवडीत राष्ट्रवादीला यश मिळाले खरे, पण त्याचे वाटेकरी मात्र अनेकजण झाले आहेत.
नेमकी हीच स्थिती भाजपमध्येही आहे. महापालिकेच्या कारभाराची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे होती. त्यांनी अडीच वर्षात सर्वांनाच बरोबर घेऊन कारभार करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांनाही अपयश आले. प्रत्येक नगरसेवकाचे समाधान ते करू शकले नाहीत. अगदी त्यांच्या गाडीतून फिरणारे नगरसेवकही फुटले. इनामदार तसे हळव्या मनाचे. त्यामुळेच भाजपच्या पराभवानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. आता इनामदार यांच्यावर स्वपक्षातून हल्ले होत आहेत. किंगमेकर म्हणून उल्लेख करणारी मंडळीही आता त्यांच्यावर टीका करू लागली आहेत. अपयशाचा वाटेकरी एकच असतो, याचा अनुभव या दोघांना येत आहे.
चौकट
किंगमेकरचा नवा आयाम
महापालिका व विधानसभा निवडणुकीनंतर शेखर इनामदार यांना किंगमेकर हे बिरूद भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. तसे फलकही शहरभर लागले होते. पण एका पराभवाने किंगमेकरचा अर्थच बदलून टाकला. दुसरीकडे बागवान हे महापौर झाले असते तरच किंगमेकर ठरले असते. पण ती संधीही त्यांना मिळाली नाही. उलट नवे किंगमेकरच उदयाला आले आहेत.