सांगली : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेऊ पाहणाऱ्या सांगलीकरांसाठी आता रेल्वेच्या माध्यमातून अनेक गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सुट्यांच्या हंगामात तिकिटांची उपलब्धताही झाली आहे.देशभरातील अनेक चांगल्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी रेल्वेचा पर्याय सांगलीकरांना मिळाला आहे.वडोदरा येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांसाठी मे महिन्यापासून म्हैसूर-उदयपूर पॅलेस क्वीन ही गाडी उपलब्ध आहे. या गाडीतून उदयपूर, चितोडगडलाही जाता येते. कर्नाटकातील दांडेली अभयारण्य, श्रवणबेळगोळ, धारवाड, हुबळी, चिकमंगळूर हिलस्टेशन तसेच बंगळुरु जवळील महालक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी सांगली स्थानकावरून सांगली-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेसची तिकिटे उपलब्ध आहेत.सांगली-परळी वैजनाथ डेमू एक्स्प्रेस रेल्वे गाडी पकडून तुळजापूर (उस्मानाबाद-धाराशिव स्टेशन), अक्कलकोट (कुर्डूवाडी स्टेशन), पंढरपूर विठ्ठल मंदिर, औसा किल्ला, हत्ती बेट, गंज गोलाई, जगदंबा मंदिर व खरोसा गुफा (लातूर) याठिकाणी भेटी देता येऊ शकतात.प्रवाशांना दिलासा सांगली व परिसरातील गावे व शहरांमधील प्रवाशांना उन्हाळी सुटीतील पर्यटनासाठी सांगली स्थानकावरून अनेक गाड्यांचे पर्याय मिळाले आहेत. प्रवाशांनी सांगलीतून प्रवास करावा. उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वे गाड्यांचे बुकिंग जलदगतीने फुल्ल होते. त्यामुळे आताच पर्यटनाचे नियोजन रेल्वेच्या माध्यमातून करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी केले आहे.
सांगलीतून उन्हाळी पर्यटनासाठी रेल्वेकडून अनेक गाड्या, प्रवाशांची सोय; 'या'ठिकाणी देता येतील भेटी
By अविनाश कोळी | Published: April 24, 2024 4:47 PM