सांगली : नाट्यसृष्टीतील लेखक मंडळींमुळेच माझ्यासह अनेकांचे संसार सुखाचे झाले. देवल, खाडिलकर, गडकरी, किर्लोस्कर यांच्या लेखन कौशल्यामुळेच आमच्या जिभेवर सरस्वती नांदत आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.
सांगलीतील देवल स्मारक मंदिरतर्फे नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार जयंत सावरकर यांना देण्यात आला. शास्त्रीय गायक अरविंद पिळगावकर यांच्याहस्ते व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्काराचे वितरण झाले.सावरकर म्हणाले की, देवल पुरस्कार मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. आतापर्यंत जो प्रवास केला त्याचे सार्थक झाले, अशी माझी आजच्या घडीला भावना आहे. देवल, खाडिलकर, गडकरी, किर्लोस्कर आदींच्या लेखन कौशल्यामुळेच आमच्या जिभेवर सरस्वती नांदते आहे. एखाद्या लेखकाचा पुरस्कार मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.
अरविंद पिळगावकर म्हणाले, सांगलीसारख्या शहरावर महापुराचे संकट आले होते. या संकटातून बाहेर पडून सांगलीकरांनी सांस्कृतिक कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. जयंत सावरकर यांनी मराठीतील नामवंत लेखकांनी लिहिलेल्या विनोदी व्यक्तिरेखा जिवंत केल्या.
आ. गाडगीळ म्हणाले की, देवल, खाडिलकरांच्या नाटकांची परंपरा संस्थेने पुढे नेली. सामाजिक प्रश्न मांडणारे नाटके सादर करून त्यातून महाराष्ट्राचा पुरोगामी विचार मांडला. संस्था शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. संस्थेला सर्वतोपरी मदत करू.
संस्थेचे अध्यक्ष शरद बापट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रकांत धामणीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय रुपलग यांनी मानपत्र वाचन केले, तर अंजली भिडे यांनी आभार मानले.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर जयंत सावरकर यांनी काही नाट्यप्रवेश सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. यावेळी ५८ व्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत व्दितीय क्रमांक संपादन केलेल्या ‘मंदारमाला’ नाटकातील कलाकार व तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला.