तासगाव/मांजर्डे : हातनूर (ता. तासगाव) येथील होनाईदेवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान माऊली जमदाडे (गंगावेस तालीम, कोल्हापूर) याने पैलवान भारत मदने (गोकुळ वस्ताद तालीम, पुणे) याला हप्ता डावावर अस्मान दाखवत सव्वा लाखाचे इनामासह ‘होनाई केसरी’ होण्याचा मान मिळवला. ही कुस्ती नेत्रदीपक झाल्याने प्रेक्षकांची त्यांनी वाहवा मिळविली.
प्रथम क्रमांकाची कुस्ती जनार्दनशेठ पाटील यांच्यातर्फे लावण्यात आली होती. द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान विजय धुमाळ (कोल्हापूर) व विष्णू खोचे (पुणे) यांच्यात एक लाख रुपयांची आप्पासाहेब शेठ व धोंडीराम घाडगे (हातनूर) यांच्यामार्फत लावली होती. ही कुस्ती विजय धुमाळने घिस्सा डावावर जिंकली. तृतीय क्रमांकाची कुस्ती उदय पाटील (हातनूर) यांच्यातर्फे लावली होती.
या कुस्तीत देवीदास घोडके (पुणे) याच्यावर लांग लावत सचिन जामदार (कोल्हापूर) याने ७५ हजारांची कुस्ती मारली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती वसंत माळी यांच्यातर्फे जालिंदर मारगुडे (बेणापूर) व नाथा पालवे (सांगली) यांच्यात ६० हजार रुपयांसाठी होती. ही कुस्ती बराच वेळ लांबल्याने पंचांनी गुणांवर नाथा पालवे याला विजयी घोषित केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती दत्ता नरले (कोल्हापूर) व संभाजी कळसे यांच्यात ५१ हजार हजार रुपयांसाठी झाली. ही कुस्ती दत्ता नरले याने घुटना डावावर काळसेला आसमंत दाखवत जिंकली. ही कुस्ती डॉ. अमोल सोनटक्के यांच्यावतीने लावली होती.
सहावी कुस्ती हर्षवर्धन थोरात-कोल्हापूर याने प्रशांत शिंदे -सांगली याला एकलंगीवर पट लावत २५ हजार रुपये बक्षीस जिंकले. कोरे ेपरिवार व तांबोळी परिवार यांच्यावतीने ही कुस्ती लावली होती. सातवी कुस्ती किशोर पाटील (हातनूर) व सागर जाधव (कोल्हापूर) यांच्यात २१ हजार रुपयांसाठी चव्हाण परिवार-दुधोंडीकर यांच्यावतीने लावली होती. यामध्ये किशोर पाटीलने सागर जाधवला चितपट केले.
महिला कुस्त्यांमध्ये मोनिका लोखंडे (हातनूर) हिने ऋतुजा शिंदे (जरंडी) हिला चितपट करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.या मैदानावर लहान मोठ्या दीडशे ते दोनशे कुस्त्या झाल्या. दुपारी २ वाजता श्री क्षेत्र होनाईदेवी डोंगराच्या पायथ्याशी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्त्या सुरू झाल्या. पंच म्हणून दादा पाटील, अर्जुन पाटील, सुभाष कदम, दिनकर गायकवाड, राजेंद्र शिंदे, शंकर पाटील, दादा जाधव, शिवाजी जाधव, प्रकाश माने, नंदकुमार पाटील, जालिंदर पाटील, धनाजी पाटील, बाळासाहेब साळुंखे यांनी काम पाहिले.
जि. प. सदस्य प्रमोद शेंडगे व होनाईदेवी मंदिर जीर्णोद्धारासाठी देणग्या देणाºयांचा सत्कार यात्रा कमिटीमार्फत करण्यात आला. मैदानासाठी यात्रा कमिटीचे विलास पाटील, प्रकाश खुजट, आदिनाथ किल्लेदार, रावसाहेब पाटील, भीमराव पाटील, पंडित शिंदे, नारायण पाटील, मनोज पाटील, मच्छिंद्र जाधव, तानाजी पाटील, पोपट कोळी यांनी प्रयत्न केले.