विटा (सांगली) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विटा येथे मराठा आरक्षण कृती समितीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. मात्र दुपारी ३० ते ३५ तरुणांनी अचानक तहसीलदार कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन इमारतीवरून उडी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, तहसीलदारांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी आंदोलकांची मोबाइलवरून चर्चा घडवून आणली. त्यानंतर तरुणांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे घेतला.विटा येथे सोमवारपासून मराठा आरक्षणासाठी कृती समितीच्या वतीने संघटक शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास सुरू झाले. शेकडो तरुणांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास संतप्त तरुणांनी आंदोलनस्थळी तहसीलदार कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर शंकर मोहिते, विकास जाधव, शशिकांत शिंदे, महावीर शितोळे यांच्यासह सुमारे ३० ते ३५ तरुण इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवर गेले. पोलिस व प्रशासनाची धावपळ सुरू झाली. आंदोलकांनी तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना बोलावून घेतले. त्यावेळी तहसीलदार गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर तहसीलदार गायकवाड यांनी थेट पालकमंत्री खाडे यांच्याशी फोनवरून आंदोलकांची चर्चा घडवून आणली.त्यावेळी पालकमंत्री खाडे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. त्यानंतर तरुणांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे घेतला.
मराठा आंदोलन पेटले: सांगलीतील विट्यात तरुणांचा इमारतीवरून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:50 AM