सांगली : मराठा समाजाला ५० टक्के ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत भोसले, सतीश साखळकर, आनंद देसाई, राहुल पाटील, विश्वजीत पाटील, देव मोरे, योगेश पाटील, धनंजय शिंदे, ओंकार पवार, धीरज मोरे, दिनेश बाबर, अमोल खराडे, वसंत सावंत, अवधूत सूर्यवंशी, अजय देशमुख, चेतक खंबाळे, सतीश पवार, जयराज बर्गे उपस्थित होते.
मोर्चाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पन्नास टक्क्यांवरील आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नसल्याने सामाजिक मागास प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसी वर्गामध्ये समावेश करावा, ओबीसी यादीमध्ये समाविष्ट जातींचे सर्वेक्षण झालेले नसताना त्यांना लाभ दिला जात आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण होऊनही त्यांचा यादीत समावेश नाही. हे पूर्णत: घटनाबाह्य आहे.
ओबीसी प्रवर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या ५० टक्के प्रमाणात आरक्षण द्यावे, ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करावे, तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्यावी, आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने नोकरभरती घेऊ नये, उमेदवारांच्या वयाची मर्यादा वाढवावी, समांतर आरक्षणातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शैक्षणिक सवलती व वसतिगृहाच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, सारथीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष तयार करावा, रखडलेल्या नियुक्त्यांचा तातडीने निर्णय घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.