सांगली : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी व याच मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी सांगलीतील कृष्णा नदीतीरावर स्वामी समर्थ घाटावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी दहापासूनच कार्यकर्ते समर्थ घाटावर जमा होण्यास सुरूवात झाली होती. राज्यभर आंदोलन करताना घडलेले प्रकार लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे हे स्वत: मोठा पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते.
सध्या नदीतीत पाणी वाढले असल्याने धोका लक्षात घेऊन आंदोलकांना ठराविक जागेतच आंदोलन करण्याची सूचना देण्यात आली होती. तर नदीपात्रात पोलीस, अग्निशमनचे कर्मचारी व पोहणारे युवकही थांबले होते.आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध असो आदी घोषणा देत सुमारे तासभर कार्यकर्ते नदीपात्रातच बसून होते.
या आंदोलनात डॉ. संजय पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, श्रीरंग पाटील, नितीन चव्हाण, राहूल पाटील, योगेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.