सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते.
शिवाजी चौकापर्यंत बस आली. पण पुढे रस्त्यावर लाकडी ओंडके ठेवण्यात आले होते. त्यामुळे चालकाने रस्त्याकडेला एसटी थांबविली. तेवढ्यात एसटीवर जोरदार दगडफेक सुरु झाल्याने चालकासह प्रवाशी बचावासाठी सीटखाली लपून बसले. त्यानंतर पाठीमागून टायरच्याबाजूने अज्ञातांनी एसटी बस पेटविली.
हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांनी पाहिला. त्यांनी बस पेटल्याचे आरडा-ओरड करुन सांगितले. काही ग्रामस्थांनी पुढे येऊन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. चालकानेही बसमधून उडी मारली. तोपर्यंत बस चारही बाजूंनी पेटली होती. या घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मदतीने पाण्याचा मारा करुन बसची आग विझविण्यात आली. ही बस शिराळा आगाराची आहे.