सांगली - राज्यभरात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना गावोगावी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे मोर्चे काढण्यात येत आहे. सांगलीतील खेराडे विटा या गावातील सकल मराठा समाजानेही गावात कॅन्डल मार्च काढून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
सकल मराठा मोर्चाचे समन्वयक अमोल महाडिक यांनी यावेळी म्हटलं की, मराठा समाजाला त्यांच्या हक्कांचे आरक्षण मिळायला हवे यासाठी खेराडे विटा गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. आता नाही तर कधीच नाही असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जालना येथे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्यावतीने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला माजी न्यायमूर्ती आणि मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे गेले होते. यावेळी न्यायप्रक्रियेला लागणाऱ्या विलंबाबाबत कायदेशीर बाबी जरांगे पाटील यांना माजी न्यायाधीशांनी समजावून सांगितल्या. त्यानंतर सरकार करत असलेले प्रयत्न मंत्र्यांनी जरांगे पाटलांना सांगितले. त्यानंतर उपस्थित समाज बांधवांशी चर्चा करून जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.