विटा : विटा येथील साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे शनिवार, दि. ३० व रविवार, दि. ३१ रोजी ३४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षी प्रसिध्द साहित्यिक भारत सासणे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष रघुराज मेटकरी यांनी दिली. यावर्षी विट्यातील साहित्य संमेलन दोन दिवस चालणार असल्याचेही मेटकरी यांनी यावेळी सांगितले. मेटकरी म्हणाले, दि. ३० रोजी दुपारी ४ वाजता ‘माझे विद्यार्थी’ या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक विश्वास पाटील यांच्याहस्ते होणार असून त्यानंतर ‘वाचन का? व कसे?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, विनोद शिरसाठ व साहित्य अकादमीचे सदस्य अविनाश सप्रे सहभागी होणार आहेत.रविवार, दि. ३१ रोजी साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली आ. डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सत्यविजय बॅँकेचे अध्यक्ष प्रकाशराव ऊर्फ बाळासाहेब पवार यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी सकाळी कवयित्री सौ. स्वाती शिंदे-पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. तिसऱ्या सत्रात रात्री ९ वाजता प्रा. विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून यात हिंमत पाटील, रवी राजमाने हे सहभागी होणार आहेत. (वार्ताहर)
विट्यात मराठी साहित्य संमेलन
By admin | Published: January 22, 2016 12:57 AM