जयवंत आदाटे।
जत : जतच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ वर्षानुवर्षे येथील नागरिकांनी सोसला. सहजासहजी पाठ न सोडणाऱ्या या दुष्काळाचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात कमी झाल्याचे चित्र आहे. मार्चपर्यंत टँकर सुरू झाला नसल्याची घटना जतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या समाधानकारक कामाचे परिणाम आता जत तालुक्यातील नागरिकांना दिलासादायक ठरू पाहत आहेत.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ४२ गावांची निवड झाली होती. त्यामध्ये जत मंडलातील चार, डफळापूर- तीन, कुंभारी-आठ, मुचंडी-तीन, शेगाव-चार, माडग्याळ-दहा, उमदी-तीन, संख-सात याप्रमाणे गावांची निवड करून तेथे काम करण्यात आले आहे. २०१६-१७ या वर्षात तीस गावांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये जत मंडलातील सहा, डफळापूर- चार, कुंभारी- एक, मुचंडी-चार, शेगाव-सहा, माडग्याळ- दोन, उमदी- तीन, संख-चार याप्रमाणे आहेत. या तीस गावांत जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध प्रकारची ९९१ कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत; तर ७१ कामे प्रगतीपथावर आहेत. त्या कामांवर ७ कोटी ५६ लाख २९ हजार इतके अनुदान खर्च झाले आहे. या कार्यालयाच्यावतीने ९४७ कामांसाठी एक हजार २४१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. मार्च २०१८ अखेर शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी ४३६ कोटी ४७ लाख रुपये इतका निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जत तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
वन विभागाच्यावतीने विविध प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत. लघुसिंचन विभागामार्फत सर्व कामांसाठी २०० कोटी ९३ लाख २३ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता.जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत तीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी दोन कोटी २ लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. महसूल विभागामार्फत ६९ विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वच कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
यासाठी ४३ लाख ४६ हजार रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ५६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी सर्वच काम पूर्ण झाले आहे. वीस कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.या सर्व कामांचे परिणाम दुष्काळाची दाहकता कमी होण्यावर होत आहेत. दुष्काळमुक्त जतचे स्वप्न पूर्ण होण्याची नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांना बळ मिळू लागले आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात एक हजार ९०३ कामांचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी एक हजार ४८७ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, तर एक हजार ४८२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २४२ कामांना सुरुवात करण्यात आली असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत, तर १५८ कामे प्रगतीपथावर आहेत.- अभिजित पाटील,तहसीलदार, जत