लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने पूजा साहित्य खरेदीसाठी सांगलीच्या मारुती रोडवर नागरिकांनी गर्दी केली होती. मागणी वाढल्याने फुलांचे भाव वाढले होते.
गेल्या काही दिवसांपासून फुलांचे दर उतरल्याने उत्पादकांची चिंता वाढली होती. मात्र, मार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी फुलांची मागणी वाढल्याने दरात दिलासादायक वाढ झाली. प्रत्यक्षात फूल उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांनी त्यात अधिक फायदा मिळविल्याचे चित्र होते. गुरुवारी सांगलीच्या बाजारात झेंडू १२० रुपये, शेवंती १२० ते १३० रुपये किलो, पांढरी शेवंती ३०० रुपये तर निशिगंध २५० रुपये किलोने विकला गेला.
फुलांचे दर वाढल्याने हारांच्या किमतीही वाढल्या. त्यामुळे वाढीव किमतीने फुले नागरिकांना खरेदी करावी लागली. दिवाळीनंतर सर्वप्रकारच्या फुलांचे भाव घसरले होते. अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादकांत नाराजी होती. मार्गशीर्ष महिन्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला. गेली महिनाभर फुलांना चांगला भाव मिळत आहे. विशेषत: बुधवारी व गुरुवारी भाव अधिक मिळत होता. आता हा महिना संपणार असल्याने पुन्हा भाव उतरण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सायंकाळी बाजारात पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मारुती रोडवर गर्दी केली होती. फुले, पाने, फळे, अगरबत्ती व अन्य साहित्यांचे स्टॉल मारुती रोडवर लागले होते. सायंकाळी चारनंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.