सांगली : मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई विभागातील ज्या उमेदवारांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या कारवार येथील मरीन बायॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) केले आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. इच्छुक तरुणांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.मेगा भरती २०१९ मध्ये शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९० जागा भरणार असल्याचे जाहीर करुन तशी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानंतर क वर्गातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या ७९ जागा जाहीर केल्या आहेत.उर्वरित अ व ब वर्गाच्या ११ जागांची भरती जाहीर केली नाही. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी बी.एफ्.एस्सी. ही पदवी ग्राह्य धरली आहे. वास्तविक महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय विभागात १९८९-९० पासून एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) पात्रताधारक उमेदवारांची भरती झाली आहे. आजही असे अधिकारी मत्स्यव्यवसाय विभागात सेवेत आहेत.
असे असताना केवळ बी.एफ.एस्सी. ही पात्रता ग्राह्य धरल्याने मत्स्यविभागात गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणाऱ्या एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) उमेदवारांवर शासनाने अन्याय केला असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे. मत्स्यव्यवसाय विभागात ब व क वर्गातील ७९ जागा जाहीर केल्या आहेत.
ज्या ७९ जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी व उर्वरित ११ जागांसाठीही एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) ही शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरून सुधारित ९० जागांची फेरजाहिरात द्यावी व अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मरीन बायॉलॉजी पात्रतेच्या उमेदवारांनी लोकमतशी बोलताना केली आहे.तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सांगलीचे खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे.