जत : जत तालुक्यातील एका गावात ३२ वर्षांच्या विवाहितेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सुखदेव श्रीमंत लोखंडे (वय ३८, रा. खिलारवाडी) याच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान शेतात घडली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला मंगळवारी सकाळी गावालगत असलेल्या एका शेतात जनावरांना गवत आणण्यासाठी गेली होती. संशयित सुखदेव लोखंडे हा तिच्यावर पाळत ठेवून तेथे गेला होता. त्याने संबंधित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर घाबरून भीतीने पीडित महिलेने आरडाओरडा सुरू केला. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. घडलेली घटना तिने घरी येऊन सांगितली. त्यानंतर सायंकाळी त्याच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अर्चना खांडेकर करत आहेत.