दत्ता पाटील
तासगाव : राज्यातील अनेक बाजार समित्यांनी कोविड रुग्णालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या आणि सक्षम असणाऱ्या तासगाव बाजार समितीने मात्र कोरोनाच्या संकटकाळात संधिसाधू धोरण अवलंबले आहे. तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी धडपडत असताना समितीतील कारभाऱ्यांना मात्र जनतेचे विस्मरण झाल्याची टीका होत आहे. बाजार समितीने कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. पाच वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या विस्तारित मार्केटचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र मार्केटचा प्रश्न मार्गी लागला नाही. एकीकडे वादग्रस्त कारभाराबाबत टीका होत असतानाच विद्यमान संचालक मंडळाला सलग दोन वेळा मुदतवाढीची लॉटरी लागली. मिळालेल्या मुदतवाढीचा कालावधी तरी किमान सामान्य जनतेसाठी सत्कारणी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काेराेनाच्या संकटकाळात तासगाव बाजार समितीने मात्र संधिसाधू भूमिका घेत डोळेझाक केली आहे.
राज्यातील बाजार समित्यांनी कोविड सेंटर्स उभारावीत, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक बाजार समित्यांनी पणन संचालकांकडे निधी खर्चासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार १० लाखांवर सरप्लस असलेल्या बाजार समित्यांना सरप्लस रकमेतून खर्चाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आठ बाजार समित्यांनी रुग्णालये सुरू केली आहेत; तर २२ बाजार समित्या रुग्णालये सुरू करणार आहेत.
तासगाव बाजार समितीदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल दोन कोटींपेक्षा जास्त आहे; तर २५ लाखांपेक्षा जास्त सरप्लस आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनात आणले तर सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करणे बाजार समितीला अशक्य नाही. एकीकडे शासनाचे सहकार्य असतानाच, बाजार समितीशी बेदाणा उद्योगामुळे अडत दुकानादार, व्यापारी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडूनही मदत उपलब्ध होऊ शकते.
चौकट
मुदतवाढ सत्कारणी लागेल
बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालात करण्यात आली होती. नेमके याच काळात राज्यात सत्ताबदल झाला. राष्ट्रवादी सत्तेत आली. पणनमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे बरखास्तीची कारवाई टळली. त्यात कोरोनोच्या संकटामुळे दोनवेळा मुदतवाढ मिळाली. किमान या काळात कोरोना रुग्णालय सुरू केल्यास मिळालेली मुदतवाढ तरी सत्कारणी लागेल.