सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर आले होते. त्यावेळी त्यांनी कर्मचारी सूर्यकांत कदम, एस. डी. शिरोळे यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची लेखी तक्रार कदम यांनी बाजार समिती प्रशासनाकडे दिली आहे.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता बंडगर यांनी बाजार समितीच्या सचिव आर. ए. पाटील यांनाही अरेरावीची भाषा वापरली. तुमच्या व सभापतींच्या भानगडीच बाहेर काढतो, असा आरोपही त्यांनी केला.
सूर्यकांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालक बंडगर हे मंगळवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता बाजार समितीत आले होते. त्यावेळी त्यांनी आवाज दिल्यानंतर प्रवेशद्वार उघडले. परंतु, त्यानंतर प्रवेशद्वार उघडण्यासाठी वेळ का झाला, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही शिव्या देऊ नका, माझी आई आजारी आहे, असे म्हटल्यावर, त्यांनी मारहाण केली. याची कल्पना बाजार समिती प्रशासनाला लेखी दिली आहे.
याबद्दल बाजार समिती अधिकारी म्हणाले, संचालक बंडगर यांनी अशापध्दतीने कर्मचाºयांना बोलण्याची गरज नव्हती. तसेच मारहाण करण्याचीही गरज नव्हती. कर्मचाºयांची चूक झाली होती, तर त्यांनी प्रशासनाला कल्पना देण्याची गरज होती. त्यानुसार कर्मचाºयांवर कारवाई केली असती. परंतु, त्यांनी मनमानी पध्दतीने कर्मचारी, अधिका-यांना अरेरावीची भाषा वापरणे चुकीचे आहे. याबद्दल अधिकारी, कर्मचा-यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.
कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, बाजार समिती पदाधिका-यांनी मध्यस्थी करुन, आंदोलन न करता सभापती दिनकर पाटील यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय झाला. त्यानंतरही संबंधित संचालकावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे.