लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आधुनिक शेतीसह उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती देणारे ‘बळीराजा अॅप’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिली. पिकांचे पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, रोगांचा अंदाज याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे. पीक संवर्धन सल्ला आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. शेतीमध्येही अनेक बदल होत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बळीराजा अॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातन काळापासून माहिती व दळणवळण शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे दिसते. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची श्रमिक कामे सहज होत आहेत. शेतीत कमी कष्टामध्ये जादा उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्याचे काम केले जाते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानावरील शेतीचे महत्त्व वाढू लागले आहे. बळीराजा अॅपमुळे संगणक तसेच मोबाईलवर सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येण्यासाठी अॅप्लिकेशन विकसित केले असून त्याची सुरुवात येत्या पंधरा दिवसात केली जाणार आहे. बळीराजा अॅपवर ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, गहू, ढबू मिरचीसह भाजीपाल्याबाबत लागवड करण्यापासून उत्पादन घेण्यापर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. हवामान अंदाजाची माहिती मिळणे, रोगांचा अंदाज, पाणी आणि खत व्यवस्थापन, पीक संवर्धनासाठी सल्ला, तसेच शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी, तसेच त्यांची फसवणूक होऊ नये, अन्य बाजारात शेतीमालाचा दर पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बळीराजा अॅपवर संपूर्ण माहिती मराठी भाषेतून मिळणार आहे. अॅपवर शेतकऱ्यांच्या सूचनाही स्वीकारल्या जातील. अॅप वापरताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे, असे सभापती शेजाळ यांनी सांगितले.
बाजार समिती सुरू करणार ‘बळीराजा अॅप’
By admin | Published: June 28, 2017 11:09 PM