सांगली : मार्केट यार्डात असलेली वसंतदादा सहकारी बॅँकेची इमारत बाजार समिती अवसायकाकडून विकत घेणार आहे. पणन संचालकांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. इतर राष्टयीकृत बॅँक अथवा बाजार समितीच्या प्रशासनासाठी या इमारतीचा वापर करण्यात येईल. शनिवारी झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी विकासकामे व त्याच्या अंमलबजावणीवर चर्चा करत निर्णय घेण्यात आले.
मार्केट यार्डात पूर्वी वसंतदादा सहकारी बॅँकेचे मुख्य कार्यालय होते. सांगली-मिरज मार्गावर प्रधान कार्यालय झाल्यानंतर या इमारतीत बॅँकेची शाखा सुरू होती. या इमारतीच्या लिलावाची नोटीस अवसायकांनी काढली होती. त्यानंतर बाजार समिती स्तरावर हालचाली होत शासकीय मूल्यांकनानुसार बॅँकेची ही इमारत विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २ कोटी ४२ लाख रुपयांना ही इमारत विकत घेण्याचा प्रस्ताव परवानगीसाठी पणन संचालकांकडे सादर आहे.
बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर बॅँकेने ही इमारत बांधली होती. पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर बॅँकेची १० हजार स्क्वेअर फुटाची इमारत आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांना या इमारतीच्या लिलावाची प्रक्रिया थांबविण्याची विनंती करण्यात येणार आहे. पणन संचालकांची परवानगी आल्यानंतर खरेदीची प्रक्रिया होणार आहे.यावेळी उपसभापती तानाजी पाटील, संचालक अण्णासाहेब कोरे, जीवन पाटील, फळ मार्केटचे सभापती दीपक शिंदे, वसंतराव गायकवाड, अभिजित चव्हाण, सचिव एन. एम. हुल्याळकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.बँकेची इमारत बाजार समितीस उपयोगीबाजार समितीच्या आवारात असलेल्या वसंतदादा बँकेची इमारतीचा प्रशासनासाठी अथवा राष्टÑीयीकृत बॅँकांना भाड्याने देण्यासाठी उपयोग होऊ शकतो, त्यामुळे इमारत खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात यामुळे भर पडणार आहे. पणन संचालकांच्या निर्णयानंतर कार्यवाही होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.