ओळ : इस्लामपूर पालिका प्रशासनाने नियोजन करूनही पुन्हा रस्त्यावर भरलेली भाजी मंडई.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील आठवडी बाजार बंद केले असले तरी मंडईच्या नावाखाली रहदारीच्या रस्त्यावर रोजच बाजार भरत आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. या फळभाजी विक्रेत्यांचे पालिका प्रशासनाकडून नियोजन होत नाही. त्यामुळे मुख्य चौकातील रस्त्यावरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे.
‘लोकमत’ने रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीवर वेळोवेळी आवाज उठविला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या महामारीत इस्लामपूर आणि परिसरातील भाजी विक्रेते रस्त्यावरच बसतात. याचे पालिका प्रशासनाकडून नियोजन होत नाही. पोलीस खात्याकडून एक वाहन आणि पालिकेचे एक वाहन अशा दोन वाहनांतून गर्दी करू नये, असा संदेश देत फिरण्यापलीकडे हे कर्मचारी नियोजन करत नसल्याने रस्त्यावरील गर्दी वाढतच चालली आहे.
बसस्थानक ते आझाद चौक मुुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेते बसलेले असतात. शिराळा नाका परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावरच भाजी विक्रेते दिसतात. यल्लम्मा चौक ते मामलेदार कचेरीदरम्यान असणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक फळविक्रेत्यांच्या गाड्या याठिकाणी असल्याने ग्राहकांची गर्दी असते. वाळवा बझार ते केबीपी कॉलेजपर्यंत हातगाडे, भाजी विक्रेते यांची रेलचेल असून दररोज पालिका प्रशासनाकडून या विक्रेत्यांना सूचना दिल्या जातात, पुन्हा नऊनंतर अकरा वाजेपर्यंत गर्दीची जैसे थे परिस्थिती निर्माण होऊन कोरोनाला आमंत्रितच केले जात आहे.
चौकट
ठोस उपाय हवेत
गुरुवार हा बाजाराचा दिवस मानला जातो. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. याचे नियोजन करण्यासाठी स्वत: मुख्याधिकारी अरविंद माळी आपल्या फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले; परंतु काही तासातच पुन्हा रस्ते गजबजताना दिसतात. यावर ठोस उपाय करण्याची वेळ पालिकेवर येऊन ठेपली आहे.
चौकट
...त्यामुळे गर्दी
कोरोनाच्या महामारीत छोटे-मोठे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने शहरातील इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने अर्धवट उघडून विक्री सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्यावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे.