सांगली : साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या व आज, मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी सोमवारी येथील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली. एरवी सकाळी दहापर्यंत सौदे होत असतात. पण सोमवारी दुपारपर्यंत आंब्याचे व्यवहार व वाहतुकीने फळ मार्केट गजबजून गेले होते. एकाच दिवसात १० हजार ५९४ पेट्या, तर १५ हजार ७६८ बॉक्स आंब्याची आवक झाली. देवगड, रत्नागिरीसह कर्नाटकातूनही आंबा आला आहे.
अक्षय तृतीयेच्या सणावेळी आंब्याच्या पूजनाला महत्त्व असते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून येथील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढतच होती. यंदा आंबा उत्पादनच कमी झाल्याने त्याचा आवकेवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, सांगलीतील फळ मार्केटमधून शेजारच्या चार जिल्ह्यांसह कर्नाटकातही आंबे जात असल्याने कोकणासह कर्नाटकातील आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती.
मंगळवारच्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या सौद्यावेळी विक्रमी आंब्याची आवक झाली. दरवेळी सौदे पहाटे सुरू होऊन दहापर्यंत पूर्ण होतात. सोमवारी मात्र, पहाटेपासून दुपारी दोनपर्यंत फळ मार्केट गर्दीने फु लून गेले होते. काही ठिकाणी तर त्यानंतरही सौदे सुरूच होते. तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आंबा नेण्यासाठी वाहनांंची गर्दी होती. सोमवारी पेटीचे दर सरासरी ३०० रुपये ते २ हजारपर्यंत, तर बॉक्सचे दर १०० ते ४०० रूपयांपर्यंत होते.यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवकशनिवार, दि. ४ रोजी झालेल्या सौद्यावेळी २ हजार १२५ आंबापेट्या, तर २० हजार १५० बॉक्सची आवक झाली होती. सोमवारी यात वाढ होऊन, चौपट आवक वाढल्याचे दिसून आले. सोमवारी १० हजार ५९४ पेट्या आंब्याची आवक झाली, तर १५ हजार ७६८ बॉक्सची आवक झाली. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक सोमवारी झाल्याचे फळ मार्केटच्या प्रशासनाने सांगितले.
फळ मार्केटच्यावतीने व्यापाºयांना व खरेदीदारांना सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळेच कोकणासह कर्नाटकातील आंब्याची आवक वाढत आहे. यंदा आंब्याची आवक व दरही समाधानकारक आहेत.- दीपक शिंदे, सभापती, विष्णुअण्णा फळ मार्केट, सांगली.