सांगली : सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव देशात व राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २५ मार्च २०२१ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दि. ९ एप्रिल २०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णांकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी गर्दीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार २५ मार्च २०२१ ते ९ एप्रिल २०२१ अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग व पोलीस अधीक्षक यांनी बाजारपेठा व अधिकृत भाजी मंड्यांमध्ये कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे, निर्देशांचे (सामाजिक अंतर, मास्कचा वापर) पालन होत असल्याची तपासणी करावी.
कोविड-१९ अटी व शर्तीचे, निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनेच्या मालकाकडून व आपत्ती कायद्याने निश्चित करण्यात आलेल्या दंडाची आकारणी व कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.