मिरज : मिरजेत मंगळवार पेठेत कुंकूवाले गल्लीत होणारे दोन बालविवाह चाईल्ड लाईन व मिरज शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून रोखले. दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.मिरजेत कुंकूवाले गल्लीत रविवारी रात्री सहा अल्पवयीन मुलींचा सामुदायिक विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली. लग्नासाठी सहा मुली तेथे आल्या होत्या व त्यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांच्या पथकाने चाईल्ड लाईनसोबत तेथे छापा टाकला.यावेळी सहा पैकी दोन मुली अल्पवयीन असल्याचे आढळल्याने पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. एका मुलीने तेथून पलायन केले. तर तीन मुली सज्ञान असल्याचे सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्या मुलींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. जिल्हा बाल कल्याण समिती सांगली सदस्य कालिदास पाटील, निवेदिता ढाकणे, आयुष्यात दानवाडे, दिलीप खैरमोडे, शिवकुमार ढवळे, तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
मिरजेत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले, एका मुलीने केले पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:49 PM