सांगली : कोरोनाच्या अनुषंगाने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. मंगल कार्यालये, सभागृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स यांना २० हजार रुपये, तर जिमखाना, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, कोचिंग क्लासेस, सुपर मार्केट या आस्थापनांना दहा हजार रुपये दंडाची रक्कम निश्चित केली आहे.
शासनाकडील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटींच्या अधीन राहून जिल्ह्यातील जिमखाना, मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, मॉल्स, बाजार, मंडई, कोचिंग क्लासेस, धार्मिक स्थळे, क्रीडांगण, बागा, सर्व खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणे सामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. सद्य:स्थितीत कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही या आस्थापना सूचनांचे पालन करत नसल्याचे प्रशासनाला आढळले आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी पथके तयार केली आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईबरोबरच दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य उत्पादन शुल्क विभाग व तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.