शिगाव : अमर रहे अमर रहे..शहीद रोमित चव्हाण अमर रहे घोषणांनी आणि साश्रुनयनांनी शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले.
जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण यांचे पार्थिव आज, सोमवारी पहाटे शिगाव येथे आणण्यात आले. दरम्यान, आज सकाळी शोकाकूल वातावरणात शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.तत्पूर्वी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रोमितचे पार्थिव शिगाव येथे त्याच्या घरी दाखल होताच गावच्या सुपत्राचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आई, वडील, बहीण, नातेवाईक, मित्र, गावकरी यांनी रोमितचे पार्थिव पाहताच एकच टाहो फोडला. पार्थिव गावात येताच अमर रहे अमर रहे, रोमित चव्हाण अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा रोमित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा गावकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली. पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.यावेळी पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. घराजवळ आणि गावाच्या कमानीजवळ लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजवलेल्या रस्त्यावरून शहिद रोमित चव्हाण यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.काश्मीरमधील शोपियाँ भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता.मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.