लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या प्रभाग १७ मधील त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आमदार निधीतून तरतूद करण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शुक्रवारी या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
माजी सैनिक संघटनेकडून शहरात शहीद स्मारकाची मागणी होत होती. जिल्ह्यात २००हून अधिक जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मारकासाठी आमदार गाडगीळ यांनी पुढाकार घेत १७ लाखांचा निधी मंजूर केला. या स्मारकात सर्व शहिदांची नावे कोरली जाणार आहेत तसेच त्रिकोणी बागेचे सुशोभिकरणही करण्यात येणार आहे.
हे उद्यान विकसित करण्याची नागरिकांची मागणी होती. आता ती प्रत्यक्षात येत आहे. शहिदांचा उचित सन्मान व्हावा, यासाठी स्मारकही उभारले जाणार आहे, असे आमदार गाडगीळ म्हणाले. यावेळी माजी सैनिक संघटनेकडून आमदार गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगरसेवक शेखर इनामदार, माजी महापौर संगीता खोत, गीता सुतार, माजी सैनिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी महाडिक, ब्रिगेडियर दीपक पाटील, कर्नल कल्याणी हारुगडे, सुभेदार मेजर रमेश चव्हाण, कॅप्टन लक्ष्मण शिंदे, कॅप्टन सलीम मुजावर, संपतराव निंबाळकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका रोहिणी पाटील, गीतांजली ढोपे-पाटील उपस्थित होत्या.