सांगली : शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका सोमवारी पुन्हा सुरू केला. मुख्य बाजारपेठेतील मारूती रस्ता, बालाजी चौकातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी व्यापारी, दुकानदारांनी महापालिकेच्या पथकाशी हुज्जत घातली. दिवसभरात १४५ जणांची अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमणे हटल्याने बऱ्याच वर्षांनंतर मारुती रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शहरातील मुख्य बाजारपेठा, रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात महापालिकेच्या पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. गेल्या आठवड्यात मेनरोडवरील अतिक्रमणे काढण्यात आली. त्यानंतर सलग चार दिवस सुट्टी असल्याने ही कारवाई थांबली होती. सोमवारी सकाळपासून पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली. बालाजी चौक ते आनंद चित्रमंदिरपर्यंतची अतिक्रमणे दिवसभरात काढण्यात आली. गेल्या आठवड्यात अतिक्रमण हटविलेल्या जागेवर चारच दिवसात पुन्हा अतिक्रमणे झाली होती. पालिकेच्या पथकाने पुन्हा संबंधितांवर कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले. सकाळी बालाजी चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. रस्त्यावरील डिजिटल फलक, दुकानाच्या छपऱ्या काढण्यात आल्या. गटारीवरील पक्के बांधकाम, कठडे फोडण्यात आले. नगरसेवक बाळासाहेब काकडे यांच्या दुकानासमोरील कठडेही तोडण्यात आले. मेनरोड, भाजी मंडई, बालाजी चौक, आनंद चित्रमंदिरपर्यंतच्या मारुती रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व दुकानांसमोरील छपऱ्या, शेड, लोखंडी साहित्य, कट्टे, गटारीवरील स्लॅब, फरशा, पायऱ्या, फळे व भाजी विक्रेत्यांचे स्टॅन्ड, पाट्या, हातगाडे काढण्यात आले. एकूण १४५ जणांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारपासून आनंद चित्रमंदिर, मारुती चौक, बसस्थानक, आंबेडकर रस्ता, शासकीय रुग्णालय, आमराई ते कॉलेज कार्नर या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मारुती रस्त्याने घेतला मोकळा श्वास स्
By admin | Published: December 29, 2015 12:40 AM