शरद जाधव ।सांगली : राज्यातील काही महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय सांगलीतही आहे. औंधनंतर सर्वाधिक मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा खजिना याठिकाणी पाहावयास मिळतो. मात्र, अपुऱ्या वास्तूमुळे यास अडचणी येत असून वस्तुसंग्रहालयास प्रशस्त वास्तू मिळाल्यास सांगलीच्या वैभवात भर पडणार आहे. शुक्रवारी झालेल्या जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त...
उत्कृष्ट आणि दुर्मिळ चित्रांचा संग्रह सांगलीतील वस्तुसंग्रहालयात पाहावयास मिळतो. १९१४ मध्ये मुंबईतील व्यापारी पुरूषोत्तम मावजी यांनी याची स्थापना केली. संस्थाने विलीनीकरणानंतर हे संग्रहालय मुंबईला हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, सांगलीच्या राजेसाहेबांच्या आग्रहाखातर हे संग्रहालय येथेच राहिले. सांगलीकरांना या दुर्मिळ वस्तूंचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी राजवाड्याच्या इमारतीतील काही भाग दिला व ९ जानेवारी १९५४ ला उपराष्टÑपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. सांगली संग्रहालयाचे वैशिष्ट्य हे की, जेम्स वेल्स आणि ए. एच. मुल्लर या दोन परदेशी वंशाच्या चित्रकारांची तैलरंगातील चित्रे याठिकाणी आहेत. तसेच रावबहाद्दूर धुरंधर, व्ही. व्ही. साठे, आबालाल रेहमान, गांगुली यांचीही चित्रे याठिकाणी पाहावयास मिळतात.
शबरीच्या वेषातील पार्वती, इटली येथील पिसाच्या झुकत्या मनोºयाची मार्बलमधील प्रतिकृती याठिकाणी आहे. या संग्रहालयातील ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे विजयनगरच्या कृष्णदेवरायचा ताम्रपट. या ताम्रपटाची इंग्रजी तारीख २५ आॅक्टोबर १५१२ अशी येते. यासह इतर अनेक मौल्यवान वस्तू याठिकाणी असून त्याच्या मांडणीसाठी जागा अपुरी पडत आहे. याठिकाणी दिवसाला ३० ते ५०, तर सुटीच्या कालावधित अधिक प्रेक्षक भेट देत असतात. राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची राज्यात १३ संग्रहालये असून त्यातील एक महत्त्वाचे संग्रहालय म्हणून सांगलीकडे पाहिले जाते. याठिकाणी १२०० मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. औंध येथील प्रसिध्द संग्रहालयानंतर सांगलीतच मौल्यवान वस्तू पाहावयास मिळतात. २०१५ मध्ये विजयनगर येथे झालेल्या शासकीय इमारतीशेजारी जागा मंजूर झाली असली तरी, त्यावर पुढील कोणतीच कार्यवाही झाली नाही.वैशिष्ट्यपूर्ण संग्रहया वस्तुसंग्रहालयात सवाई माधवराव पेशवे यांचे जोडे, १९४३ ला सांगलीच्या राजेसाहेबांनी मारलेली मगर, प्रचंड मोठा ढाण्यावाघ, शहामृगाची अंडी, चीन, जपान व युरोपमधून आणलेल्या रंगीबेरंगी फुलदाण्या, सांगलीतील आयर्विन पुलाची लाकडी प्रतिकृती, जपानमधील सोन्याच्या मंदिराचे मॉडेल, चिंचोक्यावर कोरलेले वाघ, हरभºयाच्या डाळीएवढ्या चंदनाच्या तुकड्यावर आकारलेल्या गणपती व नंदीच्या मूर्ती, जुने ताम्रपट यासह इतर मौल्यवान वस्तूंचा संग्रह आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत योग्यसध्या वापराविना पडून असलेल्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काही खोल्या सांगली वस्तुसंग्रहालयास दिल्यास संग्रहालयास विस्तारासाठी वाव मिळणार आहे. या कार्यालयाची इमारत ऐतिहासिक आहे. अशा ऐतिहासिक इमारतीत मौल्यवान वस्तूंची मांडणी केल्यास सांगलीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या इमारतीबाबत अडचण असल्यास विजयनगर येथे वस्तुसंग्रहालयासाठी मंजूर झालेल्या जागेवर संग्रहालय उभारण्याची आवश्यकता आहे.