४३ वर्षांपूर्वी एकत्र असणाऱ्या मित्रांनी जपले समाजभान
मुख्याध्यापक मित्राच्या वाढदिनी शाळेला दिली साहित्य भेट
४३ वर्षांपूर्वी एकत्र असणाऱ्या मित्रांनी जपले समाजभान
फोटो-दत्ता शिंदे देतील
फोटो- इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमध्ये महादेव क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शरद माळी,बी. जी.पाटील,श्रीमती एस.पी.पाटील,शेखर गायकवाड उपस्थित होते.
युनूस शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आपल्याकडे वाढदिवस साजरा करण्याच्या अनेकविध प्रथा आणि पद्धती आहेत. खास करून युवा वर्गात तर रस्त्यावर, दुचाकीवर, झाडाखाली वाढदिवस साजरा केला जातो. मात्र इथे एक वाढदिवस असा साजरा झाला की, ४३ वर्षांपूर्वी दहावीत असणाऱ्या मित्रांनी आपल्या मुख्याध्यापक असणाऱ्या मित्राचा वाढदिवस वृक्षारोपण आणि शाळेला एलईडी टीव्ही, डायस आणि ध्वनिक्षेपक असे साहित्य भेट देऊन साजरा केला.
येथील यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद माळी यांच्या वाढदिवसाचे हे समाजभान जपणारे औचित्य. १९७८ साली दहावीत असणाऱ्या माळी यांच्या मित्रांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवून मित्राचा सन्मान करतानाच शाळेच्या उपकाराचाही काहीअंशी पांग फेडला. शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. माहिती तंत्रज्ञानाच्या या विश्वात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवत शाळेला टीव्ही भेट दिला. तसेच डायस आणि ध्वनिक्षेपकही दिला आहे.
यावेळी जि. प.च्या बांधकाम विभागाचे सहायक लेखाधिकारी महादेव क्षीरसागर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, माजी नगरसेवक श्रीकांत माने, उद्योजक चंद्रशेखर गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळी, शिक्षिका एस. पी. पाटील, पी. बी. श्रीखंडे, बी. व्ही. कोकरे, सी. ए. मलगुंडे आदी उपस्थित होते. पर्यवेक्षिका एल.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जे. बी. काळे यांनी सूत्रसंचालन केले. यु. एस. सावंत यांनी आभार मानले.