सांगली चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मिरज कोविड रुग्णालयाला प्राणवायूचे सिलिंडर व बेड देण्यात आले. शरद शहा, प्रकाश पाटील यांच्याहस्ते अधिष्ठाता डॅ. सुधीर ननंदकर, डॉ. रूपेश शिंदे यांनी ते स्वीकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बाजार समितीतील व्यापारी व सभासदांनी मिरज कोविड रुग्णालयाला १३१ ऑक्सिजन सिलिंडर दिले. अतिदक्षता विभागासाठी ३० बेड व सामान्य वॉर्डासाठी ३० बेडही दिले.
कोविड रुग्णांना जीवदानासाठी सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्यविषय साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरलेल्या मिरज कोविड रुग्णालयाला मदतीचा निर्णय घेतला. प्रशासनाकडून मदतीची नेमकी गरज जाणून घेतली. त्यांच्या गरजेनुसार ऑक्सिजन सिलिंडर व बेड दिले. त्यासाठी २१ लाख रुपयांचा निधी संकलित केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांनी ही मदत स्वीकारली. कोरोनोबाधितांसाठी भविष्यातही मदतीचा हात नेहमीच पुढे राहील, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी सांगितले.
यावेळी शहा यांच्यासह सचिव प्रशांत पाटील, बाजार समितीचे संचालक मुजिर जांभळीकर, शीतल पाटील, प्रकाश पाटील, सतीश चौधरी, प्रतीक चौगुले, गजेंद्र कुल्लोळी आदी उपस्थित होते.