संतोष भिसे
सांगली : सांगलीसाठी मंजूर झालेले ४७ कोटींचे प्रसूती रुग्णालय अखेर मिरजेला पळवण्यात आले. तसा आदेश शासनाने मंगळवारी (दि. १४) जारी केला. सांगलीत महिला रुग्णालय मंजूर असल्याने प्रसूती रुग्णालयाची गरज नसल्याची मखलाशी आदेशात केली आहे. त्यामुळे सांगलीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
२०१७ पासून रखडलेल्या रुग्णालयाची अशी अखेर झाली आहे. सांगलीत पद्मभूषण वसंतदादा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील प्रसूती विभागावर सध्या क्षमतेच्या २५० टक्के जादा भार आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातूनही रुग्णांची गर्दी होते. हे लक्षात घेता शासनाने २०१७ मध्ये स्वतंत्र व सुसज्ज प्रसूती रुग्णालय मंजूर केले. त्यासाठी ४६ कोटी ७३ लाखांचा निधी ४ मार्च २०२१ रोजी मंजूर केला. प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरचे उपचार, सुसज्ज शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग आदी सुविधांचा यात समावेश होता.
चार वर्षे झाली तरी याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. निविदा निघाली नाही किंवा पाठपुरावाही झाला नाही. जणू सर्वांना त्याचा विसरच पडला. कोरोना काळात तर सांगलीचे रुग्णालय पूर्णत: भरले होते. गर्भवती महिलांना जमिनीवर झोपवून उपचार करावे लागले होते. नव्या रुग्णालयाकडे डॉक्टरांचे डोळे लागले होते. इतकी गंभीर स्थिती असतानाही रुग्णालय मिरजेला स्थलांतरित केल्याचा आदेश मंगळवारी सायंकाळी आला.
आदेशात म्हटले आहे की, सांगलीत महिला रुग्णालय मंजूर असल्याने नवे महिला व नवजात शिशू रुग्णालय मिरजेत स्थलांतरित करण्यास उच्चाधिकार समिती मंजुरी देत आहे. मुख्य इमारत, धर्मशाळा व अन्य सुविधांचा यात समावेश आहे.
दरम्यान, या निर्णयावर सांगलीकर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संकुचित राजकारणाचा फटका सांगलीला बसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पालकमंत्र्यांनी दिले होते संकेत
पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी हे रुग्णालय मिरजेला स्थलांतरित करणार असल्याचे सांगितले होते, तरीही सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, त्याचा फटका बसला आहे.