वारणावती : गणिताच्या सोप्या क्लुप्त्या समजून घेतल्या, तर गणित सोपे असते. गणित, भूमितीमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. परीक्षेचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे मुलांनी बदल स्वीकारून गणित विषयाचा संभ्रम दूर करावा, असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. नारायण गव्हाणे यांनी व्यक्त केले.
डोंबिवली येथील कृपासिंधू ट्रस्टच्यावतीने सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गणित विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, इयत्ता १० वीचा बदललेला अभ्यासक्रम व त्यानुसार परीक्षेसाठी कृती पत्रिका असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गणिताच्या सोप्या क्लुप्त्या समजून घेतल्या तर गणित सोपे असते.
मुख्याध्यापक बी. के. नायकवडी म्हणाले की, गणितासारख्या अवघड विषयाबाबत प्रा. नारायण गव्हाणे यांचे मार्गदर्शन मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे.
पर्यवेक्षक एस. ए. गायकवाड यांनी स्वागत, किरण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डोंबिवलीच्या कृपासिंधू ट्रस्टचे अध्यक्ष मारुती सिरसट, महेश शिरसट, सुरज सारूक, जी. जी. पाटील, मुकुंद कांबळे आदी उपस्थित होते. जाधव यांनी आभार मानले.