सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळातर्फे घेतलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात मुंबई महापौर केसरी माऊली जमदाडे याने आंतरराष्ट्रीय विजेता सोनू याला अस्मान दाखवून ‘अजिंक्यतारा केसरी’ या किताबावर आपले नाव कोरले. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विक्रमसिंहराजे भोसले, रवींद्र कदम, राजू भोसले, चंद्रकांत जाधव, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जगदाळे, उत्तमराव पाटील, दिलीपराव निंबाळकर, किरण साबळे-पाटील, धर्मराज घोरपडे, राजाराम जाधव, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता सुधीर कुमार, महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव विरुद्ध महान भारत केसरी योगेश बोंबाळे, महाराष्ट्र चॅम्पियन गोकुळ आवारे विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे, महाराष्ट्र चॅम्पियन श्रीपती कर्णवर विरुद्ध राष्ट्रवादी केसरी विजय घुटाळ या प्रत्येकी एक लाखाच्या पाच कुस्त्या झाल्या. महाराष्ट्र चॅम्पियन विलास डोईफोडे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन गणेश जगताप, महाराष्ट्र चॅम्पियन रवी शेडगे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम पाटील, नॅशनल विजेता सोमवीर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोखड, त्रिमूर्ती केसरी सुनील शेवतकर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पोपट घोडके, नॅशनल चॅम्पियन शैलेश शेळके विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष लवटे अशा लाखाची बक्षिसे असलेल्या ९० कुस्त्या रंगतदार झाल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणच्या नामवंत मल्लांनी मैदान गजबजले. खास आकर्षण असलेल्या मुंबई महापौर केसरी माऊली जमदाडे विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता सोनू ही प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि विक्रमसिंहराजे भोसले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, वसंतराव मानकुमरे, रवींद्र कदम, राजू भोसले यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. दोन्ही मल्लांनी चलाखी दाखवून एकमेकांवर झडप घेतली. दोघेही कसदार पैलवान असल्याने कोण जिंकणार लक्ष लागले होते. माऊली जमदाडेने अचूक चढाई करत सोनूला अस्मान दाखवले. दोन नंबरची कुस्ती अमोल फडतरे आणि सुधीर कुमार ही बरोबरीत झाली. तीन नंबरला मारुती जाधववर योगेश बोंबाळे याने मात केली. चौथ्या कुस्तीत गोकुळ आवारे आणि कार्तिक काटे यांच्यात रंगतदार लढत झाली. (प्रतिनिधी)
माऊली जमदाडे ‘अजिंक्यतारा केसरी’
By admin | Published: March 30, 2017 11:32 PM