खानापूर : बलवडी (खा., ता. खानापूर) येथील श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत विकास जाधव (आंतरराष्टय कुस्ती संकुल पुणे) हा जखमी झाल्याने, माऊली जमदाडे (गंगावेश, कोल्हापूर) याला विजयी घोषित करण्यात आले. या कुस्तीसाठी तीन लाखाचे इनाम ठेवण्यात आले होते. मैदानात पंचवीस लाख रूपयांची बक्षिसे वाटण्यात आली.
प्रथम क्रमांकासाठीची माऊली जमदाडे (कोल्हापूर) विरूध्द विकास जाधव (पुणे) यांच्यातील कुस्ती जेमतेम पाच मिनिटे चालली. दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत सावध पवित्रा घेतला. पाचव्या मिनिटाला डाव-प्रतिडाव टाकताना झालेल्या हालचालीत विकास जाधवचा हात दुखावला. हाताच्या दुखापतीमुळे कुस्ती करणे अवघड असल्याचे विकास जाधव याने सांगितले. त्यामुळे पंचानी माऊली जमदाडेस विजयी घोषित केले. या कुस्तीसाठी निवृत्ती दिऊबा गायकवाड यांच्या स्मरणार्थ दिलीप गायकवाड, मुरलीधर गायकवाड, विजय गायकवाड, शरद गायकवाड यांनी तीन लाखाचे इनाम ठेवले होते.
द्वितीय क्रमांकासाठीची समाधान पाटील (खवसपूर) विरूध्द सचिन मलबर (पुणे) यांच्यातील कुस्ती अर्ध्या तासानंतर बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्तीसाठी मारूती (शेठ) गायकवाड यांनी दोन लाख एक्कावन्न हजाराचे बक्षीस ठेवले होते.
तृतीय क्रमांकासाठीच्या कुस्तीमध्ये भारत मदने (गोकुळ वस्ताद तालीम पुणे) याने अवघ्या आठव्या मिनिटास गणेश जगताप (पुणे) याला निकाल डावावर चितपट केले आणि उपस्थितांची वाहवा मिळविली. या कुस्तीसाठी वसंत पाटील, दत्तात्रय गायकवाड, नामदेव गायकवाड व तानाजी गायकवाड यांनी दोन लाखाचे इनाम ठेवले होते.
नेताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ विठ्ठल घोडके (वायफळे) यांनी लावलेली संतोष दोरवड (कोल्हापूर) विरूध्द विष्णू राजाराम गायकवाड व योगेश बोंबाळे (कोल्हापूर) विरूध्द साईनाथ रानवडे (पुणे) या दोन्ही कुस्त्या प्रदीर्घ वेळेनंतर बरोबरीत सोडविण्यात आल्या. या दोन्ही कुस्त्यांसाठी प्रत्येकी दोन लाखाचे इनाम ठेवले होते.
सिध्देश्वर गायकवाड व गजानन जाधव यांनी बक्षीस म्हणून ठेवलेल्या चांदीच्या गदेसाठी झालेल्या लढतीत श्रीपती कर्णवार (मोतीबाग, कोल्हापूर) याने पंधराव्या मिनिटास देवीदास घोडके (क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूर) याला एकचाक डावावर अस्मान दाखविले.एक लाख इनामाच्या कुस्तीत विजय गुटाळ (कोल्हापूर) याने कौतुक डाफळे (पुणे) याच्यावर एकलंगी डावावर शानदार विजय मिळविला. या कुस्तीसाठी मालोजी (आबा) शिंदे बेणापूर यांनी बक्षीस ठेवले होते. संतोष सुतार (बेणापूर) याने विलास डोईकाडे (पुणे) यास आकडी डावावर चितपट क रून मुरगन गायकवाड व तानाजी गायकवाड यांनी ठेवलेले एक लाखाचे इनाम मिळविले.
पंच्याहत्तर इनामाच्या कुस्तीत जालिंदर म्हारगुडे (बेणापूर) याने शिवाजी पाटील (कोल्हापूर) याला हप्ता डावावर, अनिल धोतरे (बेणापूर) याने पांडुरंग मांडवे (सांगली) याला दुहेरी पटावर, सुनील शेवतकर (हुरडवाडी) याने उमाजी शिरतोडे (अकलूज) याला हप्ता डावावर, तर राहुल सरख (कोल्हापूर) याने नाथा पालवे (सांगली) याला घुटना डावावर चितपट केले. राजेंद्र सूळ (सातारा) विरूध्द हर्षल सदगीर (पुणे) यांची कुस्ती सोडविण्यात आली.
स्थानिक मल्ल मयूर गायकवाड (बलवडी) याने अभिजित मानकर (इचलकरंजी) याला मोळी डावावर अस्मान दाखवित पंच्याहत्तर हजाराचे इनाम जिंकले. पन्नास हजाराच्या कुस्तीत सिकंदर शेख (कोल्हापूर) यानेही सतीश मुढे (आटपाडी) याला चितपट केले. अक्षय कदम (कुंडल) विरूध्द प्रवीण अपराध (सांगली) यांच्यातील पन्नास हजाराची कुस्ती बरोबरीत सोडविली.
पंधरा हजाराच्या कुस्तीत अविनाश गायकवाड (बलवडी) याने अजय डोंगरे (भाटवडे) याच्यावर निकाल डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला.कुस्ती मैदानास दुपारी दोन वाजता सुरूवात झाली. विद्युत प्रकाशाची सोय असल्याने मैदान रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते. मैदानाचे संयोजन माजी सरपंच परशुराम गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, पोलीसपाटील शिवाजी गायकवाड, मुरलीधर गायकवाड, जगन्नाथ डिसले, शंकर गायकवाड, सदाशिव गायकवाड, नितीन गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, रामचंद्र गायकवाड, सिध्देश्वर गायकवाड, संभाजीराजे गायकवाड यांनी केले.
पंच म्हणून राजेंद्र शिंदे (बेणापूर), अर्जुन पाटील, भाऊसाहेब पाटील, संतोष वेताळ, दादासाहेब पाटील, दिनकर गायकवाड, सयाजी शिंदे, सुनील मोहिते यांनी काम पाहिले, तर मैदानाचे बहारदार निवेदन शंकर पुजारी (कोथळी) व प्रा. रामचंद्र गुरव (बलवडी) यांनी के ले.मैदानास आमदार अनिल बाबर, डबल महाराष्ट केसरी चंद्रहार पाटील, मल्लसम्राट अस्लम काझी, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच उत्तमराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, गोविंद पवार, रावसाहेब मगर, पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदानात दोनवेळा पावसाने हजेरी लावूनही मैदान सुरळीत पार पडले. मैदानातील पंचवीस ते तीस हजार कुस्ती शौकिनांनी कुस्त्यांचा आनंद लुटला.