पलूस : येथे शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या महान भारत केसरी माऊली जमदाडेने बाजी मारली. ४९ मिनिटे चाललेल्या कुस्तीत त्याने सेनादलाच्या विक्रांत कोटीवाला (हरयाणा) याच्यावर गुणांनी मात केली. माऊलीने पाच लाखांच्या बक्षिसासह मानाची गदा पटकावली. या जोरदार लढतीने शौकिनांची वाहवा मिळवली.कुस्ती लागताच दुसऱ्याच मिनिटाला माऊली जमदाडेने हाताची चाड काढण्याचा प्रयत्न केला. त्याने मोळी डावाची पकड घेतली आणि खडाखडी सुरू झाली. ४५ मिनिटांनंतर ही कुस्ती गुणांवर करण्याचा निर्णय पंच घेत होते, पण प्रेक्षकांनी मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रकुल विजेते पंच राम सारंग यांनी दोघांना पाच मिनिटांची वेळ दिली. दोघांची खडाखडी झाली, पण कुस्ती निकाली झाली नसल्याने ती गुणांवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेच माऊली जमदाडे गुणांवर विजयी झाला. ही कुस्ती औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखानदारांच्या वतीने प्रायोजित केली होती. या कुस्तीचे पंच म्हणून नारायण सिसाळ यांनी काम पाहिले.तीन वर्षे महापूर, कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पलूसचे कुस्ती मैदान होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावेळी कुस्ती मैदानात प्रेक्षकांचा उत्साह होता.तीन लाख रुपये इनामासाठी द्वितीय क्रमांकाची कुस्ती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आमदार विश्वजीत कदम यांच्या वतीने लावण्यात आली. ही कुस्ती अक्षय मंगवडे आणि सीना इराणी यांच्यात झाली. दोघांनी तीनवेळा एकमेकांचे पट काढले. ४७ व्या मिनिटाला अक्षयने सीनाला अस्मान दाखवले.दोन लाख रुपये इनामासाठी तृतीय क्रमांकाची कुस्ती बाला रफिक शेख आणि भारत मदने यांच्यात झाली. २६ मिनिटांनी गुणांवर निकाल देण्याचे पंचांनी जाहीर केले. त्यानंतर सहाव्या मिनिटाला बाला रफिकने एकेरी पट काढला. क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने चौथ्या क्रमांकाच्या कौस्तुभ ढवळे आणि माऊली कोकाटे यांच्यातील कुस्तीत समोरून दुहेरी पट काढत माऊलीने कुस्ती जिंकली.
समीर शेख, किरण सिसाळ यांनीही चटकदार कुस्त्या केल्या. महिलांमध्ये वैष्णवी सूर्यवंशी, रिया भोसले, अमृता सिसाळ, सायली आडके, वसुंधरा पवार, श्रेया शिंदे यांनीही झटपट कुस्त्या केल्या. शंकर पुजारी यांनी समालोचन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, निलेश येसुगडे, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, प्रकाश पाटील, सुहास पुदाले, अध्यक्ष विश्वास येसुगडे, नारायण साळुंखे, ऋषीकेश जाधव उपस्थित होते.
चंपे नसणारा पैलवान
मैदानात शशिकांत गावडे या चंपे नसणाऱ्या मल्लाने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.