लोकमत न्यूज नेटवर्कबावधन : आषाढी वारीकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन जाणाऱ्या पालखीचा रथ ओढण्याचा मान यंदा बावधन (ता. वाई) येथील माजी सरपंच माधवराव बयाजी भोसले यांच्या ‘सुंदर’ आणि ‘सुकमार’ या बैलजोडीला मिळाला आहे.पालखी सोहळ्यातील रथाला जुंंपण्यासाठी आपल्या बैलजोडीला मान मिळावा यासाठी अनेक वारकरी शेतकरी इच्छुक असतात. बावधन बगाडासाठी माधवराव भोसले यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी जातीवंत बैलांची जपणूक करतात. पालखी रथाला ओढण्यासाठी बैलांची निवड करण्याच्या उद्देशाने आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ दरवर्षी बावधनला भेट देतात.यावर्षी विश्वस्त मंडळाने बावधनला भेट देऊन येथील इच्छूक शेतकऱ्यांच्या सुमारे पन्नास बैलजोड्यांची पाहणी केली. यामध्ये बैलाचे वय, छाती, शिंगे, वशींड, शेपूट, खूर, रंग त्याची चाल व काम करण्याची क्षमता यांचे परीक्षण केल्यानंतर विश्वस्त मंडळाने माधवराव भोसले यांच्या बैलजोडीची निवड केली.आळंदी देवस्थानचे विश्वस्त राहुल कृष्णा चितळकर पाटील यांच्याकडे ही बैलजोडी नुकतीच सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, महादेव मसकर, मदन भोसले, शिवाजी पिसाळ, वसंतराव पिसाळ, सरपंच सतीश पिसाळ, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, पोलिस पाटील अशोक भोसले, पप्पूराजे भोसले, सुधाकर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी २०१४ सालीही माधवराव भोसले यांच्या हिरा आणि राजा या बैलजोडीला संत तुकाराम महाराजांच्या पादूका घेऊन जाणाऱ्या पालखी रथाला ओढण्याचा बहुमान मिळाला होता.यंदाच्या वर्षी बावधनच्या बैलजोडीला पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने बावधनसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
बावधानची बैलजोडी ओढणार माउलींचा रथ
By admin | Published: June 14, 2017 11:04 PM