मिरज : महापालिकेच्या मिरज कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागातील कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारीमुळे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी मिरज कार्यालयात जन्म-मृत्यू विभागास भेट दिली. यावेळी तेथील अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.
महापालिकेच्या मिरज कार्यालयात जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नाहीत, अनेक तास ताटकळत थांबावे लागते. संबंधित कर्मचारी जागेवर नसतात. काही वेळा दाखल्यांसाठी पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी माध्यमातून प्रसारित झाल्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी मंगळवारी मिरज कार्यालयात आले. त्यांनी संबंधित तक्रारदार व्यक्तींना प्रत्यक्ष बोलावून घेतले. त्यांच्या तक्रारी ऐकून जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे व संबंधित कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत यापुढे कारभार सुधारण्याची तंबी दिली.