सांगली : महापालिका आणि विजयंत मंडळाच्यावतीने पैलवान हरिनाना पवार व बिजली मल्ल संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. सांगलीच्या कृष्णाकाठावरील मैदानात भारत व इराणच्या मल्लामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. सूर्यवंशी म्हणाले की, लाल मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाची ही तिसरी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आहे. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सायंकाळी ३ वाजता होणार आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आ. शहाजी पाटील, आ. अरुण लाड, आ. गोपीचंद पडळकर, माजी खासदार राजू शेट्टी, आयुक्त सुनील पवार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील याच्यासह पालिकेवे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत ७० कुस्त्या होणार असून यामध्ये पुरुषांच्या ५७ तर महिलांच्या ९ कुस्त्या होतील. पहिल्या क्रमांकाची कुस्ती माऊली कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा हमीद इराणी यांच्यात होणार आहे. याशिवाय कार्तिक काटे (दावनगिरी कर्नाटक) विरुद्ध संतोष दोरवड (शाहू कारखाना), नाथा पालवे (पवार तालीम) विरुद्ध दादुमिया मुलाणी (कुर्डूवाडी) यांच्यात लढती होणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मल्लाला मानाची गदा, महापौर चषक व मानाचा पट्टा दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी महापालिकेकडून १४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये ९ लाखाची बक्षिसे असून उर्वरित खर्च हा नियोजनावर खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, गौतम पवार, नगरसेवक संतोष पाटील, युवराज बावडेकर , जगन्नाथ ठोकळे, क्रीडाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.
सांगलीत येत्या रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
By शीतल पाटील | Published: March 16, 2023 5:30 PM