सांगली : महापालिकेच्या वतीने १ जून ते ४ जूनदरम्यान राज्यस्तरीय महापौर चषक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुपवाड येथील लक्ष्मी मंदिर चौकातील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर स्पर्धा होणार असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेत राज्यभरातील संघांनी सहभाग घेतल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.सूर्यवंशी म्हणाले की, १ जून रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, खा. संजय पाटील, आ. विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, दिनकर पाटील, रामभाऊ घोडके, शेखर इनामदार, दीपक शिंदे, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, राहुल पवार, बाबूराव चांदोरे उपस्थित राहणार आहेत. तर, ४ जून रोजी स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होईल.या स्पर्धेसाठी पुरुष गटात १८, तर महिला गटात १६ संघांची नोंदणी झाली आहे. मुंबई, पुणे, नांदेड, औरंगाबाद, चिपळूण, पनवेल, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीतील संघही सहभागी होणार आहेत. राज्यभरातील ४०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत. खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. सात हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारली आहे. राज्यातील पंच, सामना परीक्षकांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महापालिकेच्या गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, क्रीडाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.
सांगलीत १ जूनपासून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, ४०० खेळाडूंचा सहभाग
By शीतल पाटील | Published: May 29, 2023 6:38 PM