इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत इस्लामपूर शहराची फार बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांच्या भेटीतून अनेक गंभीर प्रश्न समोर आले. नगराध्यक्षांना त्यांच्या संस्थात्मक अडचणीतून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते.
पाटील म्हणाले, शहरामध्ये सगळीकडे डेंग्यू, चिकुनगुण्या व इतर आजार पसरले आहेत. डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आम्ही सत्तेत असताना आणलेल्या निधीतूनच कामे सुरू आहेत. मागील फडणवीस सरकारने काही निधी दिला नाही.
ते म्हणाले, प्रभाग भेटीत नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. शहरातील नागरिक माझे मतदार आहेत. त्यांना भेटणे माझे कर्तव्य आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांतून साथीचे आजार, रस्त्याचे प्रश्न समजले. त्यामुळे आता लोकांच्यात परिवर्तन होऊ लागले आहे. शहरातील लोक कसे राहतात याचे आश्चर्य वाटते. नगराध्यक्ष महिन्या- दीड महिन्यातून नगरपालिकेत एकदा येतात अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोकांचे प्रश्न कसे सुटणार? आष्टयामध्ये तुलनेने एवढे प्रश्न नाहीत. तिथे योग्य पद्धतीने काम सुरू आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत आम्ही रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी दिला आहे. तो सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वापरला जाईल. मागील सरकारने फक्त निधी देण्याच्या घोषणाच केल्या. निधी मिळाला असेल तर त्याचा विनियोग कसा झाला हे समजले पाहिजे, अन्यथा स्थानिक पदाधिकारी शासनाकडून निधी आणण्यात कमी पडले असावेत. यापुढे शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आता लक्ष घालणार आहोत.