सांगली : महापालिकेच्या मालकीचे बंद जकात नाके भाडेपट्टीवर देण्याचा ठराव महासभेत गुपचूप करण्यात आला होता. त्यावरून वादंग निर्माण झाले होते. अखेर महापौर गीता सुतार यांनी महापालिकेच्या आर्थिक हिताचा हवाला देत ई-लिलाव काढून या जागा भाडेपट्टीने देण्यात याव्यात, असे पत्र आयुक्तांना पाठविले आहे.
महापालिकेने प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील मोकळ्या भूखंडांच्या लिलावानंतर आता महापालिकेच्या बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर नगरसेवकांनी डोळा ठेवला आहे. त्यातील माधवनगर व कोल्हापूर रोडवरील दोन जकात नाक्यांसह कुपवाड येथील जागा भाडेपट्टीने देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. यावर कसलीही चर्चा सभागृहात झालेली नसताना, गुपचूप ठराव करून तो प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांनी सग्यासोयऱ्यांची सोय केल्याचा आरोप होऊ लागला होता. एकीकडे प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील जागा भाडेपट्टीवर देण्यासाठी ई-लिलाव काढण्यात आला. पण जकात नाके व कुपवाड येथील जागा मात्र परस्परच ठराव करून भाड्याने देण्याचा घाट घातला गेला होता.
त्यावर सातत्याने टीका होऊ लागल्याने अखेर महापौर सुतार यांनी या तीनही उपसूचनांबाबत माघार घेतली. त्यासंदर्भात सोमवारी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, जकात नाके बंद असल्याने या जागांचा खासगी वापर सुरू होता. त्यातून महापालिकेला कसलेच उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी या जागा भाडेपट्टीने देण्याचा ठराव करण्यात आला. सदस्यांनी दिलेल्या उपसूचनांवर कोणताही प्रश्न निर्माण न झाल्याने त्याला मंजुरी देण्यात आली. पण प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील जागांच्या ई-लिलावाला मिळालेला प्रतिसाद पाहता या जागांचेही ई-लिलाव काढावेत.
चौकट
‘लोकमत’चा प्रकाशझोत
‘बंद जकात नाक्यांवर नगरसेवकांचा डोळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अनेक नगरसेवकांना या ठरावाबाबत कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे वृत्त प्रसिद्ध होताच नगरसेवकांत खळबळ उडाली. परस्परच ठराव केल्याने भाजपमधूनही नाराजीचा सूर उमटत होता. अखेर महापौरांनी ई-लिलावाची शिफारस करीत या वादावर पडदा टाकला आहे.