सांगली : महापौर पदाच्या शर्यतीतील इच्छुक उमेदवारांनी एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. प्रबळ दावेदाराविरोधात इतर इच्छुकांची गट्टी जमू लागली आहे. त्यातून पैशाचा खेळही चर्चेत आला आहे. येत्या २१ जानेवारी रोजी होणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. महापौर पदाची निवड ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अजून निवडीची तारीख निश्चित नसली तरी, लवकरच त्याची घोषणा होणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या हारुण शिकलगार, किशोर जामदार, राजेश नाईक, सुरेश आवटी यांची नावे आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेले विजय घाडगे, निर्मला जगदाळे, रोहिणी पाटील, बसवेश्वर सातपुते यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी एकमेकांचा काटा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकमेकांशी संधान साधून, तुला उमेदवारी मिळणार नसेल तर मला मदत कर, असे साकडे घातले जात आहे. त्यातून उर्वरित अडीच वर्षात दहा महिन्यांचा महापौर हा पर्यायही समोर आला आहे. तसे झाल्यास तीनजणांना महापौर पदाची संधी मिळू शकते. पण पहिल्यांदा मान कोणाचा? यावरून पुन्हा वादाला तोंड फुटणार आहे. महाआघाडीच्या काळात इद्रिस नायकवडी यांना एक वर्षाचा कालावधी दिला होता. पण नंतर त्यांनी महापौरपद सोडण्यास नकार दिला. हा इतिहास ताजा असल्याने, इच्छुकांनी आता नाही तर कधीच नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रबळ दावेदाराविरोधात इतर इच्छुक एकत्र येऊ लागले आहेत. त्यांच्यात चर्चेच्या फेऱ्याही झडू लागल्या आहेत. येत्या २१ जानेवारी रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीला आमदार पतंगराव कदम व जयश्रीताई मदन पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतीही होतील. त्यामुळे नगरसेवकांनी आपलेच नाव नेत्यांसमोर घ्यावे, यासाठी इच्छुकांनी साम, दाम नीतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यात आर्थिक तडजोडीत माहीर असलेल्या काही नगरसेवकांनी लक्ष्मीदर्शनाशिवाय पाठिंबा न देण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)बैठक कोठे? : नियोजनावरून वाद सुरूकाँग्रेस नगरसेवकांच्या २१ जानेवारीस होणाऱ्या बैठकीवरून वाद निर्माण झाला आहे. एका नगरसेवकाने, बैठकीचे निमंत्रण देत आहे. त्यावर पतंगराव कदम अथवा जयश्रीताई पाटील यांच्याकडून निरोप आल्याशिवाय ही बैठक अधिकृत होऊ शकत नाही. बैठकीचे निमंत्रण गटनेते किशोर जामदार यांना येईल, अशी भूमिका महापौर विवेक कांबळे यांनी घेतली आहे, तर काही नगरसेवकांनी बैठकीचे ठिकाण बदलण्याची मागणी जयश्रीतार्इंकडे केली आहे. त्यामुळे नियोजित बैठक कोठे होणार, याचीच चर्चा सुरू आहे. विजय बंगल्यावर चकरामदनभाऊ पाटील यांच्या विजय बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या चकरा वाढल्या आहेत. सर्वच इच्छुकांनी जयश्रीतार्इंची भेट घेऊन उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. दिवसभर बंगल्यावर इच्छुक व त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ लागली आहे.
महापौर पदासाठी उमेदवारीची गट्टी
By admin | Published: January 18, 2016 11:09 PM