सांगली : ऑनलाईन महासभेत उपसूचनेद्वारे भूखंड, शाळांच्या जागा कवडीमोल भाड्याने घश्यात घालण्याचा डाव सुरू होता. त्याला सर्वपक्षीय कृती समितीने विरोध करताच महापौर गीता सुतार यांनी उपसूचनेद्वारे केलेले ठराव रद्द केल्याचे स्पष्ट केले होते. पण आता त्यांनी यु टर्न घेतला असून या उपसूचनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचा आरोप समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी गुरुवारी केला.
महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मिरजेतील अमन युथ असोसिएशनला दिलेल्या जागेची मुदत संपल्याने पुन्हा याच संस्थेला २९ वर्षे भाडे कराराने जागा देण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच सांगलीतील एक जागा चेतक व्यायाम मंडळाला २९ वर्षे मुदतीने, तर बाल हनुमान नगरमधील बंद शाळा एका व्यायामशाळेला देण्याचा ठराव करण्यात आला होता. या उपसूचना संतोष पाटील, मैनुद्दीन बागवान व प्रकाश मुळके या नगरसेवकांनी दिल्या होत्या. त्याला महापौरांनी संमती दिली. पण या ठरावाबाबत एकाही नगरसेवकाला माहिती नव्हती. त्यावरून गदारोळ उडताच महापौरांनी हे ठराव रद्द करण्यात आल्याचे सभेत जाहीर केले होते. पण आता या तीनही जागांच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महापौरांनी महासभेत दिलेला शब्द फिरविला असून सर्वपक्षीय नगरसेवकांनी संगनमताने जागा लाटण्याचा उद्योग सुरू केला आहे. हे ठरावही रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साखळकर यांनी दिला आहे.