इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मयूरेश वृषभनाथ पाचोरे यास ‘त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी’ तैवान या विद्यापीठाने अभियांत्रिकीतील उच्च शिक्षणासाठी संपूर्ण शिष्यवृत्ती देऊ केली आहे.
या शिष्यवृत्तीमुळे तो ‘इन्स्टिटयूट ऑफ नॅनोटेक्नॉंलॉजी अँड मायक्रोसिस्टम’ या संस्थेमध्ये एकात्मिक पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करू शकणार आहे. हे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. ‘त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी’, तैवान हे विद्यापीठ क्यू एस जागतिक क्रमवारीत १६८ व्या क्रमांकावर आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत मयूरेश यास संपूर्ण शैक्षणिक फी माफीसह संपूर्ण शिक्षण कालावधीसाठी मासिक १३ हजार ५०० रुपये शैक्षणिक भत्ता मिळणार आहे.
डॉ. एस. के. पाटील, डॉ. ए. पी. शाह यांनी त्याला आंतरराष्ट्रीय अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी आणि प्रा. आर. डी. सावंत यांनी त्याचे अभिनंदन केले.