सांगली : माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धेत अमृत गटात महापालिकेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शासनाकडून महापालिकेला सात कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.महापौर सूर्यवंशी म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानात राज्यातील ४०६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत गटात सांगली महापालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. त्यासाठी सात कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन, सौंदर्यीकरण यासह अभियान काळात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.पुढील स्पर्धेमध्ये महापालिका पहिल्या क्रमांक राहण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व सामाजिक संघटना प्रयत्नशील असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक योगेंद्र थोरात, मनगू सरगर उपस्थित होते.महापालिकेचे विशेष योगदानया यशामध्ये महापालिकेच्या आरोग्य, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष योगदान आहे. आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धा, उपक्रम, योजना हाती घेतल्या व त्यांचे शासनाकडे सादरीकरण केले. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सिटी समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, स्नेहलता वर्धमाने, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, वैष्णवी कुंभार, शिवम शिंदे, सिधिक पठाण, विश्वराज काटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.
‘माझी वसुंधरा’मध्ये सांगली महापालिकेला सात कोटींचे बक्षीस, राज्यात दुसरा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 3:44 PM