सांगली : ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात पाप करण्यासाठी हे अधिकारीच पैशाची मागणी करीत आहेत. पैसे दिले तर करेक्ट माप, अन्यथा मोठ्या मापाचे फिडिंग नुकसान करण्याची धमकी पेट्रोल पंप मालकांना देत आहेत.पेट्रोल पंपात लिटरच्या मापाची पडताळणी करून देण्यासाठी ३५ हजाराची लाच घेताना विटा (ता. खानापूर) येथील वरिष्ठ वैधमापन निरीक्षक दिलीप शंकर राजमाने (वय ५४, रा. वांगी, ता. कडेगाव) यास रंगेहात पकडण्यात आले.
यानिमित्ताने वैधमापन विभाग चर्चेत आला आहे. ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मालात मापात पाप होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी हा विभाग आहे. मात्र हा विभागच मापात पाप करून देण्यासाठी पैसे गोळा करीत असल्याचे राजमाने याच्या कृत्यावरून स्पष्ट झाले आहे.पेट्रोल पंपावरील यंत्रातील मापाची वर्षातून एकदा पडताळणी करून घ्यावी लागते. वैधमापन, पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व पंपातील यंत्राचा अभियांंित्रकी असे संयुक्तपणे पडताळणी करतात. यंत्रातील लिटरच्या मापाची पडताळणी केली जाते. यासाठी वैधमापनचे अधिकारी पत्र्याचे पाच लिटरचे माप सोबत घेऊन जातात.
पेट्रोलियम कंपनीचे अधिकारीही माप आणतात. पण वैधमापनचे अधिकारी ते वापरू देत नाहीत. आम्ही आणलेल्या मापाद्वारेच पडताळणी केली जाईल, असे सांगतात. तत्पूर्वी वैधमापनचा अधिकारी पंप मालकाची भेट घेतो.
मापात पाप करायचे असेल तर मला ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगतो.मापात पाप म्हणजे, प्रत्येक लिटरमागे २० मिलीलिटर पेट्रोल ग्राहकांना कमी जाईल, असे सेटिंग. पंप मालकाने पैसे देण्यास नकार दिला, तर मग २० मिलीलिटर माप वाढवून देणार, अशी धमकी दिली जाते.
माप वाढवून दिले, तर २० मिलीलिटर पेट्रोल ग्राहकांना जादा जाऊ शकते. एखाद्या पंपावर दररोज हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असेल, तर २० मिलीलिटरप्रमाणे २० लिटर पेट्रोल जादा जाऊन पंप मालकाचे नुकसान होते.