सांगली : यावर्षीच्या खरीप हंगामात ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, त्या गावांमध्ये ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण २८५ गावांना या निर्णयाचा फायदा होणार असला तरी, टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असतानाही, केवळ ५० पैशांपेक्षा जादा पैसेवारी आहे, म्हणून आटपाडी तालुक्याला मात्र यातून वगळण्यात आले आहे.
शासनाकडून दरवर्षी खरीप हंगामातील पैसेवारीचा अहवाल घेण्यात येतो. यंदाही तो घेण्यात आला असून त्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या २८५ गावांमध्ये शासकीय परिभाषेत ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे. मिरज - ३९, तासगाव ६९, कवठेमहांकाळ ६०, जत ५० आणि खानापूर तालुक्यातील ६७ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे टंचाईसदृश परिस्थिती अधिक गंभीर असणाºया जत तालुक्यातील १२० गावांपैकी केवळ ५० गावांना याचा लाभ मिळणार आहे.
तसेच जत, कवठेमहांकाळइतकीच दुष्काळी परिस्थिती अनुभवणाºया आटपाडी तालुक्याचा यात समावेशच करण्यात आलेला नाही. गेल्या मान्सूनमध्ये आटपाडी तालुक्यात कमी पाऊसमान होऊनही सरासरीपेक्षा जादा पाऊस झाल्याचा अहवाल सादर झाला होता. आता आटपाडी तालुक्याची पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने दुष्काळी लाभापासून तालुक्याला वंचित रहावे लागणार आहे.यादीतील गावांना : मिळणार हे लाभजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकºयांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही.