कुपवाड : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनता दलाच्या वतीने रविवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथे गुंठेवारीधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
प्रा. शरद पाटील म्हणाले की, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी प्लॉटधारकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सांगली (विश्रामबाग) येथील दांडेकर मंगल कार्यालयात रविवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे. शासनाने सन २०२० पर्यंत राज्यातील गुंठेवारीला नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या संधीचा सांगली-मिरज व कुपवाड येथील सर्व गुंठेवारीधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जनता दलातर्फे करण्यात आले आहे. आपल्या शहरातील अनेक गुंठेवारीधारकांनी यापूर्वी महानगरपालिकेकडे रीतसर दंडाची रक्कम भरून नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. परंतु, त्यांना अद्याप महापालिकेकडून दाखले मिळालेले नाहीत. ज्यांनी अद्याप नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करावेत. यासाठी जनता दलामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. मेळाव्यास महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी प्लॉटधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. शरद पाटील यांनी केले आहे.
या वेळी जनता दलाचे ॲड. के.डी. शिंदे, ॲड. फय्याज झारी, जनार्दन गोंधळी, शशिकांत गायकवाड, प्रेमचंद पांड्याजी उपस्थित होते.