सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांच्या स्वागत कमानीचे बांधकाम बेकायदेशीरपणे प्रशासनाने पाडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बौद्ध समाजातील ग्रामस्थांनी गाव सोडून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २१ जुलै रोजी चर्चेसाठी बोलावल्यामुळे पाच जणांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले आहे. तरीही आंदोलकांचा लाँग मार्च चालूच राहणार आहे.आंदोलकांचा लाँग मार्च गुरुवारी सायंकाळी इस्लामपूर येथे पोहोचला आहे. इस्लामपुरात मुक्काम करून शुक्रवारी पुन्हा लाँग मार्च चालू असणार आहे. मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाशी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन पुढे चालू राहणार आहे. मागण्यावर ठोस निर्णय झाला तर आंदोलकांच्या ठिकाणी जाहीर सभा होऊन तहकूब करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी दिली.दरम्यान, पुरोगामी संघटनांची बेडग प्रश्नावर गुरुवारी सांगलीत बैठक झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजी गुरव, डॉ. बाबूराव गुरव, माजी नगरसेविका ज्योती अदाटे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, प्रा. गौतम काटकर, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, डॉ. रवींद्र श्रावस्थी, डॉ. संपत गायकवाड, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, राज्य सरकारने बेडगच्या स्वागत कमानीच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर शनिवारपासून महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर आंदोलन चालू होईल. बेडग गावातील बौद्ध समाजाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावांची कमान पोलिस सुरक्षेत पाडली आहे. त्यामुळे आम्हाला गाव राहिले नाही, म्हणून सर्व नागरिक घरांना कुलूप लावून गावाबाहेर पडले आहेत, ही बाब गंभीर आहे. गावातील लोक विरोध करत नाहीत, पण साथही देत नाहीत. म्हणून राज्यातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमधील सर्व लोक आंदोलकांच्या पाठीशी आहेत. अधिकारी-राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढला पाहिजे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी चर्चेला बोलावल्यामुळे आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन चालू होणार आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री, खासदार, प्रशासनाची बघ्याची भूमिकापालकमंत्री सुरेश खाडे यांनी बेडगचा वाद मिटविण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही. खासदार संजय पाटील हेही गप्प आहेत. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. राज्यकर्ते आणि प्रशासन नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून शोषितांवर अन्याय करत आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण करून काय साध्य करायचे आहे, असा सवाल धनाजी गुरव व प्रा. संपत गायकवाड यांनी केला.
परवानगीनंतर कमान का पाडली?२००२ मध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन परवानगी दिली आहे. पुन्हा २००८ मध्ये काम लोकवर्गणीतून पूर्ण करण्याचा परवाना दिला. त्यानंतर दि. ३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा जागा निश्चित करून परवानगी दिली आहे. त्यानंतर हे बांधकाम सुरू झाले, याला कोणीही गावातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र अचानक अधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने कमान का पाडली, असा सवालही डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला.