सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी आता थेट कारभारात लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत जयश्रीताई पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करीत होत्या. पण आता पालिकेतच आढावा बैठका घेऊन नगरसेवकांच्या अडचणी त्या जाणून घेणार आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने केलेल्या नियोजनाबाबत लवकरच त्या महापालिकेत बैठक घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील यांनी तब्बल ४० वर्षे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व केले. गेल्यावर्षी त्यांच्या निधनानंतर पालिकेची सूत्रे जयश्रीताई पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. सत्ताधारी काँग्रेसमधील नगरसेवकांनी श्रीमती पाटील यांची भेट घेऊन, नेतृत्व करण्याची मागणी केली. तेव्हा ‘तुम्ही एकसंधपणे पारदर्शी कारभार करा’, अशी सूचना त्यांनी केली होती. पण त्यानंतर थोड्याच काळात काँग्रेसमधील एकसंधतेला तडा गेला. एका गटाने विशाल पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत मदनभाऊ गटाशी संघर्ष सुरू केला. त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. तरीही पालिकेतील सत्ताकारणावर अजूनही मदनभाऊ गटाचेच वर्चस्व आहे. या गटाकडे महापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते व सर्व प्रभाग समित्यांचे सभापतीपद आहे. आता सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या जयश्रीताई पाटील यांनीच थेट कारभारात लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी शिवाजीनगर शिक्षण संस्थेच्या पत्रकार बैठकीच्या निमित्ताने जयश्रीतार्इंनी लवकरच आढावा बैठक घेण्याचे बोलून दाखविले. आतापर्यंत पालिकेतील पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांना पारदर्शी कारभार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या असल्या तरी, त्या प्रत्यक्षात अजूनही महापालिकेत आलेल्या नाहीत. आता पावसाळ्याच्या निमित्ताने त्यांची पालिकेत एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात गुंठेवारी व विस्तारित भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती बैठकीत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)बैठक : आणि बहिष्कारगेल्याच आठवड्यात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला विशाल पाटील गट गैरहजर होता. त्याबद्दल काँग्रेसमध्ये उलट-सुलट चर्चाही सुरू आहे.
जयश्रीताई घेणार महापालिकेत बैठक
By admin | Published: June 30, 2016 11:22 PM